Ad will apear here
Next
असा प्रीतीचा नाद अनाहत..!


तो : अगं, मनातल्या आनंदाची इतरांवरही पखरण करता येते...

ती : बघ बरं... सांभाळ स्वत:ला... आत्ता खूप आनंद होतोय तुला पण नंतर दु:खाचे चटके बसायला लागतील...

तो : आपण या क्षणी खूप आनंदात राहिलो, तर नंतर दु:खाचे चटके बसतील अशी तुला भीती वाटते?

ती : नाही... मला मुळात आनंद होत नाही आणि त्यामुळे दु:खाचे चटकेही बसत नाहीत...

तो : पण आनंद अनेक गोष्टीत सामावलेला असतो... तो एंजॉय करायला शीक...

ती : उदाहरणार्थ?

तो : सोबतीनं मजा करणं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये धमाल वाटणं... निसर्गसौंदर्य न्याहाळणं... मनाच्या तळातली गुपितं कुणाला तरी विश्वासानं सांगणं...

लहानपणापासून कधीच ‘आनंद म्हणजे काय’ हे ठाऊक नसलेल्या ‘तिला’ तो हे सगळं म्हणतो तेव्हा त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ वाटतं...

नंतर ‘मला इतक्या प्रेमानं आजतागायत कधी कुणी सादच दिली नव्हती’ असं त्याच्या मिठीत शिरून म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी साचतं... आणि सगळ्यांनी नाकारलेल्या, चिडवलेल्या तिच्या होरपळलेल्या मनाच्या वेदनेनं आपलेही डोळे भरतात...

या प्रसंगांमधली ‘ती’ म्हणजे शार्लोट व्हेल... Now, Voyager... या १९४२ सालच्या चित्रपटाची नायिका. या चित्रपटाच्या सुरुवातीला गबाळ्या कपड्यातली, जाडजूड भुवयांमुळे अजूनच अजागळ दिसणारी, लठ्ठसर शार्लोट म्हणजे आईला उतारवयात झालेलं, जवळपास नकोसं असलेलं अपत्य... तिची आजी शोभेल अशा वयाच्या, श्रीमंत, दुराग्रही, अधिकार गाजवणाऱ्या, कह्यात ठेवण्याच्या स्वभावाच्या आईनं शार्लोटचं आयुष्य झाकोळून टाकलेलं असतं...

ती किती कुरूप आहे याची जाणीव करून दिल्यामुळे सतत अस्वस्थ, निराशेच्या गर्तेत बुडालेली आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास संपूर्ण गमावलेली शार्लोट नर्व्हस ब्रेकडाउनच्या काठावर उभी आहे असं मनोविकारतज्ञ सांगतात, तेव्हा तिची आई म्हणते ‘मनोविकार हा शब्दच किती लाजिरवाणा आहे... आणि आमच्या घराण्यात नर्व्हस ब्रेकडाउन कोणालाच झालेला नाही.’ (१९४२पासून आजतागायत मानसिक विकारांबद्दलची ही खेदजनक मानसिकता तश्शीच आहे...)

यानंतर शार्लोट नर्व्हस ब्रेकडाउनमुळे काही काळ सॅनिटोरियममध्ये जाते. तिथे शार्लोट या ‘एका कुरूप वेड्या पिल्ला’चं ‘राजहंसा’त रूपांतर होतं... सॅनिटोरियममधून बाहेर पडलेली, डौलदार कपड्यातली देखणी शार्लोट पाहून आपल्यालाच बरं वाटतं... पण हा असतो तिच्यातला शारीरिक बदल... ‘सगळं जग आपल्याला सतत झिडकारतं आहे, आपण कोणालाही नकोच आहोत, असं तिला जे मनातून वाटत असतं ते कसं बदलणार?’ असा प्रश्न आपल्याला पडतो. 

तो बदल व्हायला कारण ठरतो शार्लोटला बोटीवर भेटलेला जेरी... एकमेकांकडे आकर्षित होऊन बेहद्द, बेभानपणे प्रेमात पडणारं हे जोडपं पडद्यावर पाहणं हाच एक रोमान्स आहे.

... पण जेरी विवाहित असतो. त्याला दोन मुली असतात. आर्किटेक्ट असलेल्या जेरीची बायको त्याचा, त्याच्या व्यवसायाचा आणि धाकट्या मुलीचा दुस्वास करत असते; पण मुलींकडे पाहून घटस्फोट घेणंही त्याला जमत नाही. त्या चौघांचा फोटो पाहताना शार्लोट सहज विचारते, ‘धाकटी टीना तुम्हाला नको होती का?’ जेरी चपापून म्हणतो, ‘तुला असं का वाटलं?’ फोटोतली जेरीची मुलगी टीना ही टीनएजर शार्लोटचंच प्रतिबिंब असते. चष्मा लावलेली, जाडसर, अजागळ!

चित्रपटात काही वळणं येतात. एका वळणावर शार्लोट ज्या सॅनिटोरियममध्ये पूर्वी गेलेली असते तिथेच परत सहज गेल्यावर तिला टीना भेटते.. अजूनही अविवाहित असलेली शार्लोट आईच्या मायेनं टीनाला सांभाळते. डॉक्टरांच्या परवानगीनं तिला आपल्या घरी घेऊन येते. टीनामधला आत्मविश्वास जागवण्याचं काम शार्लोट करते.

नंतर एका प्रसंगात जेरी मुलीला भेटायला येतो, तेव्हा आपलं एकमेकांवरचं जीवघेणं प्रेम शार्लोट आणि जेरीला जाणवतं; पण तो टीनाला परत घेऊन जायचं ठरवतो. आपल्या आणि आपल्या मुलीमुळे शार्लोट दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करून आनंदी राहू शकत नाही असं त्याला वाटत असतं. त्या प्रसंगात ‘सतत मी तुझ्याकडून काहीतरी घेतोच आहे. हे बरोबर नाही. मी तिला परत नेतो,’ असं जेरी म्हणतो. त्यावर ‘तू खरं तर टीनाला माझ्याकडे सांभाळायला ठेवतोयस हे एक प्रकारे देणंच आहे. तू तुझ्या काळजाचा तुकडा मला देतो आहेस,’ हे शार्लोटचं उत्तर आपल्यालाही समृद्ध करतं.

‘दु:खीच साह्य होतो दु:खात दु:खिताला...’ या गदिमांच्या ओळीचा अर्थ Now, Voyager हा चित्रपट पाहताना क्षणोक्षणी जाणवतो. उपेक्षित, एकाकी माणसालाच आपल्यासारख्या माणसाचं दु:ख सहजी जाणवू शकतं. Inferior complex मुळे टीनाला कोणाबरोबर खेळायचं नसतं तेव्हा तिची बाजू घेणं, आईनं ‘तू जरठकुमारी म्हणूनच आयुष्यभर राहणार का,’ असं उपरोधानं, कुत्सितपणे विचारल्यावर अपमानानं दुखावलं जाणं, जेरीनं परफ्यूम भेट दिल्यावर आनंदून जाणं, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याबाबत ‘कोई सितारे लुटा रहा था, किसीने दामन बिछा दिया...’ असे भाव व्यक्त करणं... या सगळ्यातून शार्लोट आपल्यासमोर उलगडत जाते. सोशल अँक्झायटी असणाऱ्या म्हणजे लोकांना भेटायला, त्यांच्यात मिसळायला घाबरणाऱ्या शार्लोटच्या रूपानं अनेकांची व्यथा कळायला मदत होते.

चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची अपेक्षा का धरावी? Oh, Jerry, don't let's ask for the moon. We have the stars..!’

- नीलांबरी जोशी


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OUMLCV
Ravindradattatraya Telang छानच लिहिलंय...चित्रपट बघतांना बेटी डेविस आणि पॉल हेनरिड यांचा अभिनय भारून टाकणारा होता...बेटीची आई ग्लाडियस कूपर हिला देखील विसरणं शक्य नाही...
Similar Posts
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट ‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात.
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language